आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार

(political news) ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आमदार सतेज पाटील हे शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळवणारे खरे सूत्रधार आहेत. शेतकऱ्यांची एकजूट मोडून काढण्यासाठी ते कारखानदारांची बाजू घेत आहेत, असा आरोप माजी आमदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.

आता आमची सहनशक्‍ती संपलेली आहे. त्यामुळे आरपारच्या लढाईसाठी गुरुवारी (ता. २३) शिरोली (ता. हातकणंगले) येथे सकाळी ११ पासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वप्रकारची वाहतूक बेमुदत कालावधीसाठी अडवून मुश्रीफ आणि पाटील यांना गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार राजू शेट्टी यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेट्टी म्‍हणाले, ‘मुश्रीफ व सतेज पाटील हे दोघे शेतकऱ्यांच्या काळजीपेक्षा कारखानदारांचे हित जपत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढायचे आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याऐवजी कारखानदारांचे पालकत्व निभावत आहेत. ऊसदरावर (Sugarcane Rate) निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी दोन-तीन कारखानदार चर्चेसाठी पुढे आले होते, परंतु या कारखानदारांवर मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी दबाव टाकला.

शेतकऱ्यांविरुद्ध साखर कारखानदार, सरकार, विरोधी पक्ष हे सगळे एकत्र आले आहेत, मात्र आम्ही मागे हटणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन होईल. ऊसदरावरून कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. चर्चा, बैठका व जिल्हाधिकाऱ्यांची समिती या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू आहे. मार्च २०२३ मध्ये जे साखर मूल्यांकन जाहीर केले आहे, त्यामध्ये प्रचंड घोळ आहे.

ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती म्हणजे केवळ फार्स आहे. या समितीवर पालकमंत्री मुश्रीफ यांचा दबाव आहे. त्यांना पाहिजे तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने दिला. जिल्हाधिकारी हे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या ताटाखालचे मांजर बनल्यासारखी स्थिती झाली आहे.’ यावेळी, प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, राजेंद्र गड्यानवार, अजित पोवार आदी उपस्थित होते.(political news)

जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल

शेट्टी म्‍हणाले,‘पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार, कारखानदार आता कोणतेही देणे लागत नाहीत, असे त्यांचे मत आहे, मात्र जिल्ह्यातील ९ कारखानदारांनी जवळपास १५० ते ३०० रुपये जादा दर देणे शक्य असल्याचे सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे.’

कारखाना प्रतिटन द्यावी लागणारी रक्कम प्रतिटन प्रत्यक्ष दिलेली रक्कम रुपये देणे बाकी

रेणुका शुगर ३३४५ ३१०० २४५

शरद ३००२ २९०० १०२

गुरुदत्त ३०२७ २९०० १२७

दत्त- शिरोळ २३३१ २९५० २८१

कुंभी-कासारी ३२८७ ३१५० १३७

संताजी घोरपडे ३१९४ ३००० १९४

बिद्री ३५३७ ३२०९ ३२८

डी. वाय. पाटील ३२२० ३०५० १७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *