पत्रकार व साहित्यिकांनी नव्या मुल्यांची पेरणी डोळसपणे करावी : लोकमत संपादक डॉ. वसंत भोसले
शिरोळ/प्रतिनिधी:
सध्या अराजकताजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चांगलं साहित्य, लेखण आणि लपलेले शब्दसौंदर्य शोधण्याचे काम साहित्यिक व पत्रकारांनी (journalists) करावे. पत्रकार व साहित्यिकांनी नव्या समाजव्यवस्थेविषयी नव्या मुल्यांची पेरणी डोळसपणे करावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले यांनी केले.
शिरोळ येथील टारे क्लब हाऊसमध्ये साहित्य सहयोग दीपावली आणि मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचे बक्षीस वितरण, साहित्य सहयोग दीपावली अंकाचा २१ वा वर्धापन दिन यानिमित्ताने पत्रकार (journalists) व साहित्यिक स्नेहमेळावा रविवारी पार पडला. यावेळी लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू, दत्तचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांनी स्वागत केले. डॉ. भोसले पुढे म्हणाले, अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहे. बदलाच्या विरोधात आपण नाही पण उपलब्ध होणारी माहिती अर्थ, भाषा, सौंदर्य याबाबतची माहिती समजली पाहिजे. जग मुठीत घेणारे तंत्रज्ञान उपलब्ध होत असले तरी त्याचा संदर्भ देणारी परिस्थिती, अर्थ, माहिती ही केवळ बुध्दीच्या वापरामुळेच मिळते. मी स्वत: पेन आणि कागद घेवून बसतो. या लिखाणामुळे बुध्दीला चालना मिळत असते. लिखाणाची गती आता यंत्राबरोबर जोडता येत नाही.
श्री दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, आताची परिस्थिती सुधारायची असेल तर पत्रकार व साहित्यिकांनी खऱ्या अर्थाने विचाराने दिशा देण्याची गरज आहे. सर्वच घटकांना सुधारण्यासाठी विचारांची पेरणी गरजेची असून त्यादृष्टीने सर्वांनीच वाटचाल करावी.
याप्रसंगी कथा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सुनील इनामदार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सचिन इनामदार, सुरेखा इनामदार, साहित्यिका नीलम माणगांवे, शेखर पाटील, अॅड. प्रमोद पाटील, कमलाबाई शिंदे, जयश्री पाटील, अन्नपूर्णा कोळी, के. एम. भोसले, दरगू गावडे, अविनाश सगरे, चंद्रकांत पाटील, विश्वास कांबळे, विशाखा सुतार यांच्यासह पत्रकार, साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. दगडू माने, राजेंद्र प्रधान यांनी केले. प्रा. मोहन पाटील यांनी आभार मानले.