स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्या कोल्हापूरला लागले ग्रहण
स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्या कोल्हापूरला प्रदूषणाचे (pollution) अक्षरशः ग्रहण लागले आहे. श्वसनीय व अतिसूक्ष्म धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार रविवारी कोल्हापूरच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक तब्बल 322 अशा धोकादायक पातळीला पोहोचला होता. दिल्ली, मुंबईप्रमाणेच कोल्हापूरची हवाही डेंजर झोनमध्ये गेली असून या हवेत जास्त काळ वावरल्यास श्वसनाच्या गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.
खराब रस्ते, वाहनांची बेसुमार वाढ यासह अनेक कारणांमुळे हवेच्या प्रदूषणाचा (pollution) विळखा कोल्हापूरभोवती घट्ट झाला आहे. परिणामी दिल्ली, मुंबईसारख्या शहरासारखी अवस्था कोल्हापूरची होत आहे. रविवारी मध्यरात्री सिंचन भवन येथील स्वयंचलित वायू गुणवत्ता केंद्राच्या अहवालानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक 322 पर्यंत गेला होता. मध्यरात्रीपासून सकाळी 9 पर्यंत हवा निर्देशांक 300 च्या घरात होता. याचवेळी दिल्ली येथील आनंद विहार येथे हवेची गुणवत्ता 322 इतकी होती. त्याबरोबरीने कोल्हापूरचा निर्देशांक होता.
हवेची गुणवत्ता 301 ते 400 या श्रेणीत आल्यास ती अतिखराब मानली जाते. या हवेत जास्त काळ वावरल्यास श्वसनास त्रास होऊ शकतो. हवा निर्देशांक 50 च्या आत असेल तर ती हवा स्वच्छ हवा असते.