कोल्हापूर: महिलेचा खून, मृतदेह फेकून उसाचा फड पेटवला
(crime news) भादवणजवळ जळालेल्या उसाच्या फडात गुरूवारी (दि.२८) एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या महिलेची ओळख पटली असून आशाताई मारूती खुळे (वय ४२, रा. भादवण) यांचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पण झाले आहे. याबाबत ट्रॅक्टर चालक योगेश पांडूरंग पाटील (वय ३५) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे भादवण परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भादवण व भादवणवाडी रस्त्यावर दीपक खुळे, आनंदा देवरकर यांची उसाची शेती आहे. गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान उसाला आग लागली. ती विझविण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्या उसात महिलेचा जळालेला मृतदेह आढळला होता. गुरूवारी रात्री तिची ओळख पटली. याबाबत काशिनाथ नारायण खुळे यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली होती.
बेपत्ता असलेली तीच महिला का याबाबत पोलीस शोध घेत होते. दरम्यान, जळालेल्या उसात ती महिला कशी गेली. याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असल्याने घातपाताचीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. गुरुवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. रात्री दोन वाजता एलसीबी अधिकारी समीर कांबळे यांनी गोपनीय चौकशी करून सकाळी ७ वाजता संशयित आरोपी याला ताब्यात घेतले. विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी भादवण येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खूनासाठी फड पेटवला
संशयित पाटील याने शरीर सुखाला नकार दिल्याने महिलेचा गळा आवळून खून केला. हे कळू नये यासाठी त्याने उसाचा फड पेटवला. मात्र, घातपाताचा पोलिसांना संशय आल्याने खूनाचा उलगडा झाला. (crime news)
सीसी टीव्हीमुळे उलगडा
गुरूवारी दुपारी ४ वाजता संशयित पाटील भादवणवाडी मार्गावर जाताना दिसत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याच्याच नावाची चर्चा होती. श्वान पथकही त्याच्याच घरात गेल्याने खूनाचा उलगडा झाला आणि संशयित पाटील यानेही शरीरसुखासाठी नकार दिल्याने खून केल्याची कबुली दिली.