ऑनलाइन अर्जानंतर २१ दिवसांत उत्पन्न दाखला! अवघ्या ३ कागदपत्रांची गरज

केंद्र आणि राज्य शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (Proof of income) बंधनकारक असतो. मात्र, हा दाखला काढण्यासाठी सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतो. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेकांकडून एजंटांकडून मोठी रक्कम घेतली जाते. यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक तर होतेच शिवाय वेळही वाया जातो. पण, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज केल्यास २१ दिवसांत हमखास दाखला मिळतो, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ‘रोहयो’चे जॉब कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तर पत्त्याचा पुरावा म्हणून वीज देयक, भाडे पावती, आधार कार्ड, शिधापत्रिका, फोन बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, मतदार यादीचा उतारा, वाहन चालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ व ८ अ उतारा या पैकी एक कागदपत्र अर्जासोबत लागते.

तसेच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी) आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरण पत्र, सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल, वेतन मिळत असल्यास फॉर्म नं १६, निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र किंवा अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल यापैकी एक कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र देखील आवश्यक असते. सध्या सेतू सुविधा केंद्रे बंद असल्याने नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्रांचाच आधार आहे.

घरबसल्या करता येईल उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम ‘आपले सरकार’च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर अर्जदाराला या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन घ्यावे लागेल. लॉगिन घेतल्यानंतर मग महसूल विभागात जाऊन ‘मिळकत प्रमाणपत्र’ किंवा ‘उत्पन्नाचे प्रमाणपत्र’ हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर लागू करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी (Proof of income) आवश्यक असलेली फी भरावी लागणार आहे. यानंतर मग अर्ज सबमिट करायचा आहे. एकदा की अर्ज सबमिट झाला की २१ दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *