पेट्रोल-डिझेलचा पुरवठ्याबाबत मोठी अपडेट

केंद्र सरकारने ‘हिट अँड रन’ (Hit and Run Act) या ट्रकचालकांसाठी नव्याने केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ ट्रकचालकांनी पुकारलेल्या आंदोलनातून इंधन (Fuel) वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी (Tanker Drivers Agitation) काल (सोमवार) तात्पुरती माघार घेतली. त्यामुळे आजपासून शहरातील इंधनपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले.

दरम्यान, काल सकाळपासूनच हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे मिरज येथे कोल्हापुरातून इंधन भरण्यासाठी गेलेल्या टँकरमध्ये इंधनच भरले नाही. मात्र, सायंकाळनंतर हे टँकर इंधन भरून मार्गस्थ झाले, पण उद्यापासून पंपावर इंधनच मिळणार नाही, अशी अफवा पसरल्याने शहरातील पंपांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळाली.

ट्रकच्या धडकेत एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित ट्रकचालकाला दहा वर्षांचा कारावास करण्याचा नवा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. या कायद्याला देशभर विरोध होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांनीही काल काम बंद आंदोलन केले. कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात मिरज येथून इंधन (Fuel) भरून टँकर येतात. सकाळी हे टँकर इंधन भरण्यासाठी गेले, पण आंदोलनामुळे ते त्याचठिकाणी अडकून पडले.

परिणामी काही पंपावरील इंधन काल संपले. आजपासून पंपच बंद राहणार, या अफवेने सायंकाळनंतर पेट्रोल पंपांवर गर्दी पाहायला मिळाली. काहींनी गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनातून भरून घेतल्याने काही पंपांवरील इंधन संपले, पण रात्री टँकरचालकांनी यातून माघार घेतली असून, उद्यापासून पंप सुरळीत सुरू राहतील, असे श्री. तराळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *