हिवाळा स्पेशल मिक्स भाजी रेसिपी
थंडीच्या दिवसांत सतत गरमागरम काहीतरी खावसं वाटतं. नेहमीचेच चटणी, लोणचे, सलाड यापेक्षा वेगळे काहीतरी असेल तर जेवणात रंगत येते. मग जेवताना फरसाण किंवा तत्सम काहीतरी घेण्यापेक्षा मस्त हिवाळा स्पेशल मिक्स भाजी ट्राय करा. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा काही औरच असते. घरी असलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर आणि ओला लसूण… मस्त चटपटीत आंबटगोड भाजी तयार होते. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी
हिवाळा स्पेशल मिक्स भाजी साहित्य
१ कांदा (onion)
२ मोठे टोमॅटो
३ गाजर
५ कप मटार
२ टेबलस्पून ओला लसूण
१.५ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जीरे मोहरी
कढी पत्ता
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून हळद
१ टीस्पून तिखट
१ टीस्पून धणे पूड
१ टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून गूळ
कोथिंबीर
हिवाळा स्पेशल मिक्स भाजी कृती
स्टेप १
गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, ओला लसूण स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे. कांदाही (onion) चिरून घ्यावा
स्टेप २
गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे. तेल गरम झाल्यावर, त्यात जीरे मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्यावे. नंतर त्यात कांदा आणि लसूण घालून, कांदा शिजेपर्यंत परतून घ्यावे. आता त्यात मटार टाकावे. आणि झाकण ठेवून एक वाफ आणावी.
स्टेप ३
त्यानंतर त्यात हळद, तिखट, धणे पूड घालून मिक्स करावे. आता त्यात गाजर आणि टोमॅटो टाकावे.
स्टेप ४
मिक्स करून आता त्यात चवीनुसार मीठ आणि गीला घालावा. त्याच प्रमाणे मॅगी मॅजिक मसाला टाकावा.
स्टेप ५
पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून शिजवावे. मध्ये एकदा झाकण काढून, भाजी फिरवून घ्यावी. भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करून, चिरलेली कोथिंबीर टाकावी.
स्टेप ६
छान आंबटगोड मिक्स भाजी, जेवताना गरमागरम पोळी, भात सोबत सर्व्ह करावी.