दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय?
(political news) पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय तामिळनाडू, केरळ, लक्षद्विपच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी पहिल्या दिवशी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. त्यानंतर भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला हजेरी लावली. जवळपास २० हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधानांनी तामिळनाडूत केले. निवडणुकीच्या वर्षात पंतप्रधान मोदींचा हा राज्यातील पहिलाच दौरा आहे.त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि भाजपाचे मिशन साऊथ या दृष्टीने पाहिले जात आहे. दक्षिणेत विस्तारासाठी भाजपाची रणनीती काय आहे? त्याआधी दक्षिणेत भाजपासाठी काय आव्हाने आहेत हे जाणून घ्यायला हवे. दक्षिणेकडील राज्यात भाजपासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाचा हिंदी भाषिक राज्याकडील प्रतिमेतून बाहेर पडणे. भाजपानं दक्षिणेकडील मोहिम फत्ते करण्यासाठी पंतप्रधान मोदींना मैदानात उतरवलं आहे.
दक्षिण भारतात राजकीय पाऊल ठेवण्यासाठी भाजपा सांस्कृतिक, प्रादेशिकवाद, भ्रष्टाचार यावर झीरो टॉलरेंससह केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या आधारे स्वत:ची विश्वासार्हता बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मिशन साऊथमध्ये भाजपाचे लक्ष कर्नाटक, तेलंगणानंतर आता तामिळनाडूवर आहे. मागील २०२१ च्या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपाला ४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे इथं भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु त्यावेळी भाजपानं एआयएमडीएमकेसोबत आघाडी करून निवडणूक लढली होती. जी आघाडी आता तुटलेली आहे.
तामिळनाडूत भाजपानं रणनीतीमध्ये बदल केले आहेत. भाजपानं तामिळ राज्यात शिरकाव करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीला केंद्र बनवून सांस्कृतिक राष्ट्रवाद पाया रचण्याची तयारी केली आहे. २०२२ मध्ये पहिल्यांदा काशी तामिळ संगममचं आयोजन झाले होते. अलीकडेच दुसरे काशी तामिळ संगममचे आयोजन झाले. त्यात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. मोदींनी संबोधित करताना तामिळ साधू, संत कवी आणि महापुरुषांचा उल्लेख केला. तामिळनाडूत भाषावाद कायम चर्चेत राहतो. अशावेळी मोदींनी भाषा आणि संस्कृतीवर भाष्य करणे हे या रणनीतीचा भाग मानले जात आहे. (political news)
दक्षिणेत कर्नाटक राज्य सोडलं तर इतर राज्यात भाजपाला संघटना उभी करता आली नाही. मागील काही काळापासून तेलंगणा, तामिळनाडूसह केरळ आणि दुसऱ्या राज्यात संघटना उभारण्यावर भाजपानं जोर दिला आहे. भाजपानं त्यासाठी तेलंगणा मॉडेल पुढे करून कामाला सुरुवात केली आहे. तेलंगणात भाजपाने तत्कालीन केसीआर सरकारविरोधात भ्रष्टाचार आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था यावरून रस्त्यावर आंदोलन केले होते. आता भाजपा हीच रणनीती तामिळनाडू वापरणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीचं गणित जुळवण्यासाठी भाजपाने लोकप्रिय नेत्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कर्नाटकात एचडी देवगौडा यांची जनता दल सेक्यूलर, आंध्र प्रदेशात पवन कल्याण यांची जनसेना पार्टी यांचा समावेश आहे. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, याठिकाणचे ४ लोकप्रिय चेहऱ्यांपैकी पीटी ऊषा, इलैयाराजा, वीरंद्र हेगडे आणि वी. विजेयंद्र प्रसाद यांना राज्यसभेत पाठवणेही भाजपाच्या या रणनीतीचा भाग आहे.