तळंदगेत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

(crime news) पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील जागेचा वाद व बीअरबार बंद करण्याच्या कारणावरून तळंदगे (ता. हातकणंगले) यथील तीन कुटुंबांना 9 वर्षांपासून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याप्रकरणी हुपरी पोलिसांत आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सर्वप्रथम 2015 साली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करून या बहिष्कार प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सौ. मंगल शिवाजी येताळे (वय 56, रा. तळंदगे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसांनी माणिक व्यंकू पाटील, अनिल अवघडी शिनगारे (दाढीवाले), बाळासो एक्काप्पा शिनगारे, शिवाजी नामू लंगोटे, संतोष यशवंत लंगोटे, बाळासो आप्पा मुरगुडे, युवराज रामा हजारे व सागर शंकर मेटकर (सर्व रा. तळंदगे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या धनगर समाजातील असून, त्यांच्या कुटुंबाला समाजातील विविध कार्यक्रमांपासून वाळीत ठेवण्याचा निर्णय 9 वर्षांपूर्वी बैठकीत घेण्यात आला होता, असा येताळे कुटुंबीयांचा आरोप आहे.

माणिक पाटील यांच्या सांगण्यावरून इतर सातजणांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या व त्यानंतर त्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारासंदर्भात तक्रार अर्ज केल्याच्या कारणावरून फिर्यादी सौ. मंगल येताळे व त्यांच्या कुटुंबीयांवर राग धरला होता. श्री बिरदेव मंदिर तळंदगे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत फिर्यादीचे पती शिवाजी येताळे यांना त्यांचा बीअरबार हा देवस्थानच्या जमिनीत असून, समाजाला त्याचा त्रास होत आहे, तो तुम्ही ताबडतोब बंद करा, असे सांगण्यात आले. (crime news)

त्यावेळी शिवाजी येताळे यांनी मी बार बंद करणार नाही. बार बंद करायचा असेल, तर तुम्ही शासकीय नियमाप्रमाणे बंद करा, असे सुनावले. त्यामुळे या सातजणांनी तू बार बंद केला नाहीस, तर तुला आम्ही समाजातून आजपासून वाळीत टाकत आहोत, असे फर्मान सोडले. त्यावेळी फिर्यादीचे दीर कै. बिरू शामू येताळे व सुरेश अण्णाप्पा शिनगारे यांनी बहिष्काराला विरोध करत येताळे यांची बाजू घेतली. त्यामुळे समाजातील कोणत्याही व्यक्तीने या तिन्ही कुटुंबीयांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले तर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध बंदी व निवारण) अधिनियम, सन 2016 चे कलम 5, 6, 7 अन्वये पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *