कोल्हापूर, हुपरी परिसरात बनावट सोन्याचा कारखाना?
बँकांच्या फसवणुकीसाठी लागणारे बनावट सोने तयार करून देणारा कारखाना कोल्हापूर व हुपरी परिसरात सुरू असल्याची चर्चा आहे. येथे मागणीप्रमाणे विविध प्रकारचे अलंकार तयार करून दिले जातात. सोन्याच्या पाण्याचा मुलामा मारून तयार केलेले अलंकार एखाद्या सराफाच्या नजरेलाही सापडणार नाही, अशा शिताफीने हे दागिने तयार केले जात असून, यातून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे.
बनावट सोने तारण ठेवून बँकांची फसवणूक करण्याचे प्रकार पूर्वी सहकारी बँकांंत मोठ्या प्रमाणात घडत होते; पण आता राष्ट्रीयीकृत बँकांचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
बाजारात मिळणारे सोने हे 18, 22 ते 24 कॅरेटमध्ये मिळते; पण केवळ सोन्याच्या पाण्याचा मुलामा देऊन बनावट सोने तयार करून देणारी टोळी कोल्हापूर परिसरात कार्यरत आहे. या टोळीचे नेटवर्क महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांत पसरले आहे. मागणीप्रमाणे ते अलंकार करून देतात. कोल्हापूर व हुपरी परिसराच्या मध्ये हा कारखाना सुरू असल्याची चर्चा आहे.
ठराविक प्रकारचे व केवळ सोन्याच्या पाण्याचा मुलामा देऊन चेन, बिल्वर, पाटल्या, मणी मंगळसूत्र दागिने तयार केले जातात. हे अलंकार इतक्या शिताफीने केलेले असतात की अनुभवी सराफही ते ओळखू शकत नाही. या बनावट दागिन्यावर हॉलमार्क शिक्केही मारून मिळतात.