संपकरी एसटी कर्मचारी आता अतिरेक करताहेत’, शिवसेनेच्या मंत्र्याचा इशारा

राज्य सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याचा ( st strike news ) अल्टिमेटम दिला आहे. पण ३१ मार्च आहे आणि एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरून संपावर ठाम आहेत. आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपकरी एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने आवाहन केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हायला हवं. जनतेचे होणारे हाल पाहता एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्यावर विचार करण्याची गरज आहे. सर्व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं, असं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांशी आठ वेळा चर्चा केली. नेमलेल्या समितीचा निर्णय आलाय. त्यामुळं आपल्या मागण्या कायम ठेवून तरी कामावर यावं, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांची त्यांचे नेते दिशाभूल करत आहेत, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते कर्मचाऱ्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा अतिरेक होत असल्याचा आरोप शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केला आहे. आपला भलं होणार या भावनेच्या आहारी कर्मचारी जात आहेत. मात्र याबाबत कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा विचार होणार नाही. आठ वेळा बैठका झाल्या, त्रिसदस्यीय समितीच्या अहवाल सादर होवून समितीच्या सर्व गोष्टी मान्य करण्यात आल्या. यामुळे कर्मचाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.
एसटीचं विलिनीकरण होणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले आहेत. ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना दिली आहे. एसटी संपावर इतर कुठलाही विचार केला जाणार नाही. कामावर रूजू झाले नाही तर उद्यापासून कारवाई केली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी ४ वाजता बैठक होत आहे. याबैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अजूनही ४८ हजारांवर एसटी कर्मचारी संपावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *