गगनयान मोहिमेबाबत ISRO ने दिली महत्त्वाची अपडेट

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO) गगनयान मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गगनयान मोहिमेसाठी CE20 इंजिनच्या सर्व ग्राउंड पात्रता चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रोचे CE 20 क्रायोजेनिक इंजिन आता गगनयान मोहिमांसाठी (Gaganyaan Mission) मानव-रेटेड केलेले आहे. ही अवघड चाचणी इंजिनची क्षमता दर्शवते. पहिल्या मानवरहित फ्लाइट LVM3 G1 साठी CE20 इंजिनच्यादेखील स्वीकृती चाचण्या घेण्यात आल्या आहेत.” अशी माहिती इस्रोने X वर पोस्ट करत दिली आहे.

ISRO ने १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्राउंड क्वालिफिकेशन चाचण्यांची अंतिम फेरी पूर्ण करून त्याच्या CE20 क्रायोजेनिक इंजिनच्या मानवी रेटिंगमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे; जो गगनयान मोहिमेसाठी मानव-रेटेड केलेल्या LVM3 प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक टप्प्याला ऊर्जा देईल.

CE20 इंजिनच्या मानवी रेटिंगसाठी करण्यात आलेल्या ग्राउंड क्वालिफिकेशन चाचण्यांमध्ये जीवन प्रात्यक्षिक चाचण्या, सहनशक्ती चाचण्या आणि नाममात्र ऑपरेटिंग परिस्थितींनुसार कार्यक्षमतेचे मूल्यांकन तसेच थ्रस्ट, मिश्रण प्रमाण आणि प्रोपेलेंट टँक प्रेशर यांचा समावेश होता. गगनयान मोहिमेसाठी CE20 इंजिनच्या सर्व ग्राउंड पात्रता चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत, असे इस्रोने म्हटले आहे.

मानवी रेटिंग मानकांसाठी CE20 इंजिन पात्र होण्यासाठी, चार इंजिन्सनी ३९ हॉट फायरिंग चाचण्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग परिस्थितीत ८८१० सेकंदांच्या एकत्रित कालावधीत पार पाडल्या.

ISRO ने २०२४ च्या Q2 साठी प्रायोगिक स्वरुपाच्या नियोजित पहिल्या मानवरहित गगनयान (G1) मोहिमेसाठी फ्लाइट इंजिनच्या स्वीकृती चाचण्यादेखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. हे इंजिन मानवी-रेटेड केलेल्या LVM3 वाहनाच्या वरच्या टप्प्याला ऊर्जा देईल आणि त्याची थ्रस्ट क्षमता १९ ते २२ टन आहे ज्याचा विशिष्ट वेग ४४२.५ सेकंद आहे.

गगनयान ही इस्रोची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिम आहे. गगनयान (Gaganyaan Mission) अवकाशात पाठविण्यापूर्वी घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ह्या मानवरहित चाचण्या होत्या. संपूर्ण मोहिमेच्या यशाची आणि अवकाशवीरांच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री पटल्यानंतरच सन २०२५ मध्ये गगनयान भारतीय अवकाशवीरांना घेऊन अवकाशात झेप घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *