तळून उरलेले तेल वारंवार वापरणे हानिकारक

भजी आणि पुर्‍या तळल्यानंतर कढईत उरलेले तेलही तुम्ही भाजी करण्यासाठी वापरता का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर ‘आयसीएमआर’चा हा इशारा लक्षात घ्या. बहुतेक घरांमध्ये कढईत उरलेले तेल फेकून देण्याऐवजी अन्य काही पदार्थ तळण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी त्याचा पुनर्वापर होतो. पण ही सवय तुम्हाला लवकरच आजारी बनवू शकते. ‘आयसीएमआर’चे नवीन संशोधन असेच काहीसे सांगत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वारंवार तेल गरम करण्याच्या सवयीशी संबंधित धोक्यांविषयी सांगितले आहे. वैद्यकीय संशोधन संस्थेने म्हटले आहे की,वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने त्यांच्यामध्ये विषारी संयुगे तयार होतात, ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

तेल पुन्हा गरम केल्यामुळे कुकिंग ऑईलच्या पौष्टिक आणि रासायनिक गुणधर्मांवर लक्षणीय परिणाम होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, खाद्य तेल वारंवार गरम करणे हे कर्करोग वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. सर्वप्रथम, ते शरीरातील फ्री रॅडिकल्सला प्रोत्साहन देते, ज्यामुळे जळजळ होते. ही स्थिती सूज, हृदयरोग आणि यकृताच्या आरोग्यास हानी यांसारखे अनेक गंभीर आजार वाढवते. तेच तेल वारंवार गरम करून ते स्वयंपाकासाठी वापरल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, असे संशोधनात म्हटले आहे.

कुकिंग ऑईल पुन्हा गरम केल्याने ट्रान्स-फॅट आणि एक्रिलामाईडसारखी हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हे धोके टाळण्यासाठी एकच तेल अनेक वेळा वापरण्याची सवय बदलण्याचा सल्ला दिला जातो. ‘आयसीएमआर’ने सल्ला दिला आहे की, तुम्ही भाजी बनवण्यासाठी खाण्याचेतेल गाळून पुन्हा वापरू शकता. या संशोधनात वापरलेले तेल एक किंवा दोन दिवसांत वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.घरी वापरलेले तेल गाळून भाजी बनवण्यासाठी वापरता येते, असे या अहवालात म्हटले आहे. पण पुर्‍या किंवा पकोडे तळण्यासाठी तेच तेल पुन्हा वापरणे टाळावे. याशिवाय वापरलेले तेल एक-दोन दिवसांत वापरावे. अहवालात म्हटले आहे की, आधीपासून वापरलेले तेल दीर्घकाळ वापरणे टाळावे कारण अशा तेलांमध्ये खराब होण्याचे प्रमाण जास्त असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *