भारतीयांसाठी लाँच केली खास नवी गेम! प्री-रजिस्ट्रेशन झालं सुरू
BGMI ही प्रसिद्ध मोबाईल गेम (Online Gaming) बनवणाऱ्या Krafton या कंपनीने भारतात एक नवीन गेमची घोषणा केली आहे. Garuda Saga असं या गेमचं नाव आहे. या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं असल्याची माहिती कंपनीने दिली. ही गेम भारतीय थीमवर आधारित आहे. यामध्ये यूजर्सना बंदूक नाही, तर धनुष्यबाणाने आपल्या शत्रूला हरवावं लागणार आहे.
क्राफ्टॉन इंडिया आणि अल्केमिस्ट गेम्स यांनी संयुक्तपणे या गेमची निर्मिती केली आहे. या गेममध्ये यूजर्सना विविध प्लॉट्स पहायला मिळतील. ही एक एडव्हेंचर गेम असणार आहे.
काय आहे स्टोरी?
यामध्ये गेमर्स हे ‘गरूड’ नावाचं कॅरेक्टर प्ले करतील. अल्लू नावाच्या एका राजाला नरकातून परत आणण्याचं काम गरूडवर सोपवण्यात आलं आहे. गरुडकडे शस्त्र म्हणून केवळ एक धनुष्यबाण असणार आहे. आपल्या पॉवर्स आणि स्किल्स अधिक चांगल्या करत गरुड गेममध्ये पुढे जाऊ शकेल.
या गेममध्ये (Online Gaming) 19 चॅप्टर आहेत, तर सर्व चॅप्टर्समध्ये 15 मल्टी-वेव्ह लेव्हल आहेत. गरुडा सागा गेममध्ये यूजर्सना उच्च प्रतीचे ग्राफिक्स आणि गेमिंग एक्सपीरियन्स मिळणार आहे. हार्डकोअर आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारच्या गेमर्ससाठी ही एक उत्तम गेम असल्याची माहिती क्राफ्टॉन इंडियाने दिली आहे. गुगल प्ले स्टोअर आणि Apple App Store अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही गेम उपलब्ध असणार आहे.
प्री-रजिस्ट्रेशन बेनिफिट्स
या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. कोणत्याही App Store वर जाऊन तुम्हाला Garuda Saga सर्च करावं लागेल. यामध्ये पब्लिशरचं नाव Krafton आहे याची खात्री करून मगच त्या पर्यायावर क्लिक करा. प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या यूजर्सना युनिक स्टार्टर पॅक मिळणार आहे. केवळ भारतीय गेमर्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.