१५४ वर्ष जुना पूल मे महिन्यात होणार बंद

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला १५४ वर्षे जुना कर्नाक पूल (bridge) बंद करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मे महिन्यात हँकॉक पूल खुला झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी ११२ तासांत हा पूल भुईसपाट करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. हा पूल बंद केल्यानंतर मे महिन्यात मुंबईकरांच्या वाहतूककोंडीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशिद स्थानकादरम्यान १८६७मध्ये कर्नाक पूल उभारण्यात आला होता. १९२२मध्ये या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. पुनर्बांधणीनंतर आता या पुलाला ९९ वर्षे पूर्ण झाले आहेत. सध्या या पुलावरून अवजड वाहतूक बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्टवरून मुक्त मार्गाला जाण्यासाठी हलक्या वाहनाकडून या पुलाचा वापर होतो.

पावसाळा पूर्व कामाचा आढावा घेताना मध्य रेल्वेने कर्नाक पूल बंद करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी पूल जुना झाला असून तो धोकादायक असल्याने बंद करण्याची गरज असल्याचे मान्य केले. हा पूल बंद केल्यास वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध नाही. यामुळे हँकॉक पूल खुला केल्यानंतर हा पूल बंद करण्यावर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने सहमती दर्शवली. पूल पाडण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून जून २०२१ मध्ये मंजुरी मिळाली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यातील त्रास टाळण्यासाठी तसेच वाहतूककोंडी लक्षात घेता पूल (bridge) बंद होताच तो भुईसपाट करण्यात येणार आहे. तीन महिन्यांत तो पाडण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. हे काम मध्य रेल्वे करणार आहे. यासाठी सात टप्प्यात एकूण ११२ तासांच्या ब्लॉकमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ३५० टन वजनी क्षमतेच्या दोन क्रेन आणि अन्य यंत्रणा वापरण्यात येणार आहेत. कर्नाक पुलाच्या जागी नवा पूल महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव

तत्कालीन बॉम्बेचे गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाला कर्नाक पूल असे नाव देण्यात आले. इंग्रजी, मराठी व गुजराती या तिन्ही भाषेत पुलाचे हे नाव तीन कोपऱ्यांत कोरलेले आहे. चौथ्या बाजूला या पुलाचे जहाजाचा नांगर (अँकर) हे बोधचिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *