महागाईने जगणे मुश्कील; दूध महागले

कोरोनाचे निर्बंध उठले असले, तरी महागाईची लाट मात्र वेगाने पसरत आहे. सतत वाढणार्‍या इंधन दराने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. कुटुंबाचे मासिक खर्चाचे गणित कोलमडले आहे. यातच दूध (milk) प्रतिलिटर 4 रुपयांनी महागल्याने अडचणीत भर पडली आहे.

दूध चार रुपयांनी महागले

सामान्यपणे महिन्याकाठी दहा हजारांत घर चालवणार्‍या मध्यमवर्गीयांना आता ही रक्‍कम कमी पडत आहे. त्यात कोरोनाच्या साथीने अशा कुटुंबांचे जगणे अधिक खर्चिक बनले आहे. घरातील एखादा सदस्य या लाटेत सापडला असेल, तर कोरोनापश्‍चात विकार बळावण्याची शक्यता असते. महिन्याच्या खर्चात या वैद्यकीय खर्चाची भर पडली आहे. कोरोना निर्बंधांच्या काळात नोकरदारांचे उत्पन्‍न ‘जैसे थे’ राहिले; मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दर मात्र दुपटीने वाढले. अनेक कुटुंबांचा रोजगार गेला, रेशनच्या धान्यावर कुटुंबाची गुजराण करण्याची वेळ अनेक नागरिकांवर आली. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, पेट्रोल यांचे दर भडकले आहेत. खर्च वाढला तरी उत्पन्‍न मात्र तेच राहिले. कोरोना निर्बंधांच्या काळात अनेक कामे घरून केली जाऊ लागली. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पदरमोड करून अनेकांना मोबाईल घ्यावे लागले. मात्र, त्याच्या महिन्याच्या रिचार्जने नाकी नऊ आणले. आयुष्यभर इनकमिंग फ्री म्हणणार्‍या मोबाईल कंपन्यांनी महिन्याला रिचार्ज सक्‍तीचे केले. परिणामी, महिन्याला अतिरिक्‍त खर्च वाढला.

आता दुधाचे (milk) दरही लिटरमागे चार रुपये वाढले. महिन्याच्या वीज बिलात फरक पडला आहे. पाणी बिल, पेपर बिल या सर्व मासिक खर्चाने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. मध्यमवर्गीय यातून काही मार्ग काढतील. हातावर पोट असणारे अनेक कुटुंबे मात्र यातून कसा मार्ग काढणार? याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

आम्ही खासगी नोकरी करतो. कोरोनामुळे आहे त्या पगारात कपात झाली. महागाई मात्र वाढतच गेली. सरकार कोणतेही असले, तरी याबाबत कोणीही आवाज उठवत नाही. यातून आम्ही मार्ग कसा काढायचा. सामान्यांना कोणीही विचारत नाही.
– सौ. किरण भोसले

काही प्राथमिक गरजांचा अगोदर व आताचा खर्च

खाद्यतेल : 80-180, पेट्रोल : 95-120, ज्वारी : 22-30, डाळी : सरासरी 100-140, रवा : 30-35, पोहे : 50-60, गहू : 29-35, मिरची : 130-300, शाकाहारी ताट : 50-90, मोबाईल रिचार्ज : 129-239 रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *