राज ठाकरेंचं मतपरिवर्तन हा ‘पीएचडी’चा विषय

योगी-भोगीबाबत मतपरिवर्तन अचानक कस झालं? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय आहे, असा खोचक टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलताना लावला आहे.

महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कौतुक करत राज ठाकरे यांनी योगी आदीत्यनाथ यांचं अभिनंदन केले होते. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, योगी-भोगीबाबत मतपरिवर्तन अचानक कसं झालं? राज यांच हे मतपरिवर्तन पीएचडीचा विषय आहे.

भोंग्याबाबत केंद्रीय सरकारने राष्ट्रीय धोरण करावे. केंद्राकडून महाराष्ट्र, बंगालला सावत्रपणाची वागणुक मिळते, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. भोंगा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. राज्य गृहमंत्र्यांनी सर्व पक्षांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र भाजपने त्यास विरोध केला. याचा अर्थ तुम्हाला राजकारण करायचे आहे आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात गोंधळ घालायचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भात वक्तव्य केले की, किरीट सोमय्या हे विक्रांत घोट्याळ्यातील आरोपी आहेत. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, राणा दाम्पत्यांनं राजकीय तेढ निर्माण करण्याच खूप मोठ कारस्थान केल होतं. यात एका मोठ्या राजकीय पक्षाची हात होता. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *