छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. ३०) श्री. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेवले. हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेतलेले राज ठाकरे औरंगाबाद येथे पुण्याहून निघाले होते. यावेळी त्यांनी वढू बुद्रुक येथे भेट दिली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी तसेच कवी कलश यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. समाधीस्थळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शंभू भक्त येतात आणि पुण्यतिथी उत्साहाने साजरी करत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी दिली.

तसेच पुण्यतिथीच्या दिवशी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखडाबाबत चर्चा करू, असे देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे याठिकाणी येणार असल्याने सकाळपासूनच मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘राज ठाकरे जिंदाबाद’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *