‘झाडाझाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत, ते आधी उतरवा..’, राजू शेट्टींचा संताप

हिंगोलीतल्या वसमतमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले. शेतकऱ्यांचे प्रश्न इतके बिकट झाले आहेत की त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ते आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही उतरवायचे, याचा निर्णय घ्या किंवा चर्चा करा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळायला हवा, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत, डिझेलचा दर वाढला आहे, स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे, करोना काळात शाळा कॉलेजेस बंद असल्याने खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल आहे. भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. दोन-दोन महिने डीप्या दुरुस्त होत नाहीत. यामुळे पाणी असूनही पिकं करपत आहेत. हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सध्या महाराष्ट्रात भलत्याच मुद्द्यांवर चर्चा होत आहेत. यामुळे महाराष्ट्रात जनतेच्या मनात मोठी अस्वस्थता आहे. आक्रोश आणि असंतोष आहे, म्हणून बळीराजाचा हुंकार बाहेर पडणं गरजेचं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेती पिकाला हमीभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हमीभाव कायदा करावा, शेतीला दिवसा दहा तास वीज द्यावी, एफआरपीचे पडलेल्या तुकड्याचे निर्णय त्वरित मागे घेऊन एकरकमी एफआरपी द्यावी, शेतीसाठी चालू असलेले भारनियमन त्वरित मागे घ्यावे, शासनाने शेतकऱ्यांना लुटीचे धोरण थांबवावे, रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्यावी, अशा मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या. यासाठीच बळीराजाचा लढा उभारण्यासाठी हुंकार यात्रा काढली, असं शेट्टी म्हणाले.

असं काही धाडस करा, ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने मापात पाप करण्याचं काम केल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. त्याचं बरोबर आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर भोंगे उतरवा असं म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्म गाव देवराष्ट्रे इथून ही बळीराजा हुंकार यात्रा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या सगळ्या भागांत शेतकऱ्यांच्या सभा आणि मेळावे घेऊन या यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *