शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांचा कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार!

शेती आणि शिक्षणातील केलेल्या आजवरच्या कामाबद्दल आपल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला, याचा खूप आनंद आहे. पण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण जणार नाही. त्याला काही कारणे आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार ( rajendra pawar ) यांनी म्हटलं आहे.

हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान रयतेचे राजे या राज्यात होऊन गेले. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा आदर्श घालून दिला. अगदी राज्य करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, उभ्या शेतात गोंधळ घालू नका डोलकाठ्या हवे असतील तर रयतेला राजी करून घ्या आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी आपल्या प्रशासनाला दिले होते, हे सर्वांना माहीत आहे. त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे, असं राजेंद्र पवार म्हणाले.

ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची बिजे रोवली. यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नक्षत्राची लेणी फुलवली आणि महाराष्ट्र शेतीच्या बाबतीत समृद्धीच्या मार्गाने नेला. आपण आजवरच्या आयुष्यात शेती आणि शिक्षणावर काम केले, हे मला ओळखणाऱ्या सर्वांनाच माहीत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने या महाराष्ट्रात महिला शिक्षणाची कवाडे खुली केली, हेही आपल्याला माहीत आहे, असं ते म्हणाले.

ज्यांचा आदर्श मिरवतो ते छत्रपती शिवाजी महाराज; ज्यांच्या विचाराने आपण चालतो त्या फुले-शाहू-आंबेडकर आणि हा पुरस्कार ज्या कामासाठी आणि ज्यांच्या नावाने दिला जातो त्याचा विचार करता हा पुरस्कार एखाद्या कृषी कार्यालयात किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारणे योग्य झाले असते, असं म्हणत राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांत झाले आहेत. ते पद्धतशीरपणे सुरू आहेत. ज्या महान दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे लोक (राज्यपाल कोश्यारी); या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणारे लोक आणि गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या ( राज्यपाल कोश्यारी ) हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल, तर त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मी कसा स्वीकारावा? त्याऐवजी हा पुरस्कार कृषी कार्यालयात जाऊन स्वीकारणे आपल्याला योग्य वाटेल, असं म्हणत राजेंद्र पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला.

नाशिकमध्ये आज राज्य स्तरीय कृषी पुरस्कारांचा वितरण सोहळा होतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, विश्वजीत कदम, संदीपान भुमरे या मंत्र्यांचीही सोहळ्याला उपस्थित आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *