पवारांची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र शिकला तर आणखी मातीत जाईल

पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. यावरून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्यांना इशारा दिला आहे. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी शरद पवार ( sharad pawar ) आणि सुप्रिया सुळेंवर ( supriya sule ) हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे सांगातहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. मग हे कुठले संस्कार आहेत. का त्यांनी बोललं की माफ. त्या मोठ्या घरातल्या आहेत, पवारांच्या कन्या आहेत म्हणून माफ. तुम्ही या राज्यात किती महिलांशी चुकीचं वागलात, असं म्हणत पडळकरांनी पवार घराण्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष एका तरुणीचं लैंगिक शोषण करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यांना तुम्ही सगळे सोबत घेऊन विमानातं आणि हेलिकॉप्टरमधून फिरताय, यावर तुम्ही भाष्य करत नाही. पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत. राणा दाम्पत्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यांना १४ दिवस कोठडीत टाकलं. त्या महिला नाहीत का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. आणि पवारांनी या महाराष्ट्राला संस्कृती आणि संस्कार शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार जर महाराष्ट्र शिकला तर आणखी महाराष्ट्र मातीत जाईल, असा टोला पडळकर यांनी पवारांना लगावला आहे.

सगळ्या महिलांच्या बाबतीत पवारांनी एकच भूमिका घ्यायला पाहिजे. तुमच्या पक्षातील महिलांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेता. पुण्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्याचा विषय कितीवेळा मीडियामध्ये आला. त्या पीडित मुलीने वारंवार सांगितलं, अन्याय आणि अत्याचार झाला. पण उलट चित्रा वाघ यांच्यावरच त्या मुलीला आरोप करायला लावलेत. हे जे चुकीचं काम सुरू आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला संस्कार आणि संस्कृती शिकवायची गरज नाही. महाराष्ट्राची जनता या विषयी तुम्हा संगळ्यांबद्दल जाणून आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *