‘या’ राज्यात नाइट कर्फ्यू आणि ‘मिनी लॉकडाऊन’; मंदिरे, मॉल बंद

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने नितीशकुमार सरकारने कठोर पावले टाकली आहेत. राज्यात नाइट कर्फ्यू (night curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासोबत अनेक निर्बंधही नव्याने लावण्यात आले आहेत. त्यात राज्यातील मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी बंद राहणार असून चित्रपटगृहांनाही पुन्हा एकदा टाळे लागले आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला व विविध अंगानी चर्चा करण्यात आली. त्यानंतर बिहारमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी नाइट कर्फ्यू (night curfew) लावण्याचाही निर्णय झाला. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत संपूर्ण राज्यात आता कर्फ्यू राहणार आहे. त्याशिवाय राज्यात लॉकडाऊन सारखे निर्बंध लावण्यात आले असून २१ जानेवारीपर्यंत चित्रपटगृहे, जीम, पार्क, क्लब, स्टेडियम, स्वीमिंग पूल, शॉपिंग मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी मंदिरे तसेच इतर धार्मिक स्थळेही भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे आहेत निर्बंध?

– आवश्यक सेवा सोडून इतर दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच खुली राहणार.
– आठवीपर्यंतच्या शाळा बंद राहतील. ९ ते १२वीचे वर्ग तसेच सर्व कॉलेज यांच्यासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा.
– सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालवण्यात यावीत. बाहेरील व्यक्तीस मनाई राहील.
– सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे व अन्य धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. केवळ पुजारी पुजाविधी करू शकतील.
– शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे, जीम, पार्क, क्लब, स्टेडियम, स्वीमिंग पूल पूर्णपणे बंद राहतील.
– रेस्टॉरंट तसेच ढाबे ५० टक्के क्षमतेने चालवता येतील.

– लग्नसोहळ्यात जास्तीत जास्त ५० तर अंत्यविधीला जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी असेल.
– राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल. त्यासाठी आधी जिल्हा प्रशासनाची परवानगी बंधनकारक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *