रोहित पवार शिवसेनेचे कार्यकर्ते फोडतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून नगर जिल्ह्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सुरुंग लावला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी केला आहे. सध्या शिवसेनेकडून राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरु आहे. या अभियानासाठी गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) हे नगरमध्ये गेले आहेत. यावेळी किर्तीकर यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांना इशारा दिला. रोहित पवार महाविकास आघाडीचा धर्म पाळणार नसतील तर आम्हीही बांधील नाही, अशी ताकीद गजानन किर्तीकर यांनी दिली. यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुरबुरी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

रोहित पवार हे नगरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर दबाव आणतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगतात. ही पळवापळवी आहे. रोहित पवार यांनी हे धंदे बंद करावेत, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले. तसेच शिवसेनेच्या वाट्याचा जिल्हा नियोजनाचा निधीही आम्हाला दिला जात नाही. यासंदर्भात मी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहणार आहे. आम्हाला आमच्या वाट्याचा निधी मिळालाच पाहिजे, असे गजानन किर्तीकर यांनी ठणकावून सांगितले.

रोहित पवार यांनी स्वत:चा पक्ष वाढवावा. त्यांना तो अधिकार आहे, आम्हीदेखील याठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहोत. परंतु प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी निधी मिळून द्यायचा नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत. तुम्ही शरद पवार यांचे नातू आहात. उद्या वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून या सगळ्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करेन. शरद पवार यांनाही हा प्रकार मंजूर नसेल. तेदेखील रोहित पवार यांना चार शब्द सुनावतील, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले. आता यावर रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रसचे इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *