जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादंग सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा पं. नेहरुंचा फोटो शेअर करत मोदींवर टीका केली आहे.

“संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची डॉ. लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वातंत्र्य झाला. मला काय मिळाले?, त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले…पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य. नेहरुजी हे म्हटले नाही माझ्या जीवाला धोका आहे..!”, असं ट्विट आव्हाड यांनी केलंय. संसद परिसरात घडलेल्या या घटनेचा संदर्भ देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.दरम्यान, यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. राजीव गांधी यांच्यावर राजघाट येथे झाडाच्या मागे लपून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या पी.एस.ओच्या कानाला लागून गेली होती. त्यानंतही तरीही राजीव गांधी यांनी हसतमुखाने सांगितले होते की ते ठीक आहेत. या घटनेबद्दल माहिती देत त्यांनी मोदींना सुनावलं होतं.

५ जानेवारी रोजी दौरा रद्द करावा लागल्यानंतर पंतप्रधान मोदींसह भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेस सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. ‘मी बठिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकतो, त्यासाठी तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा,’ असंही मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्याला म्हटलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदीचा ताफा अडवल्यावरून भाजपाकडून चांगलंच राजकारण करण्यात येतंय. यावरूनच जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर निशाणा साधलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *