तेरवाड : मुलीने पटकावले सुवर्ण पदक; कुरूंदवाड व परिसरातून कौतुक
(sports news) तेरवाड (ता.शिरोळ ) येथील निकिता कमलाकर हिने आशियाई युथ वेटलिफ्टिंग या स्पर्धेत रोप्य व सुवर्ण पदक पटकावले. तिचे वडील सुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग असून, ते कुरूंदवाड येथे चहाचा गाडा चालवतात.
उझेबेकिस्तान येथील तारकंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये ५५ किलो वजनी गटात snatch मध्ये सुनील कमलाकर यांची कन्या निकिता हिने ६८ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले तर clean & jerk मध्ये ९५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
मेक्सिको येथे एक महिन्यापूर्वी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यावेळी तिचे पदक हुकले होते. तिला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निकिताच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून तिचे कौतुक होत आहे. निकिता कमलाकर ही सध्या कुरुंदवाड येथील दत्त कॉलेज येथे बारावी आर्ट्सचे शिक्षण घेत आहे. (sports news)
निकिताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कशाचीही कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी आम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची तयारी आहे. अशा भावना सुनील कमलाकर, आजोबा- रावसाहेब कमलाकर यांनी व्यक्त केली.