जयसिंगपूर : स्वातंत्र्यलढ्यात आदगोंडा पाटील यांचे मोलाचे योगदान
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची बाजी लावली. यात जयसिंगपूर येथील आदगोंडा देवगोंडा पाटील यांनी स्वातंत्र्यलढ्यात (freedom struggle) मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्य चळवळीचे जिल्ह्यात ते एकमेव साक्षीदार हयात आहेत. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आज वयाच्या 107 व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींना उजाळा दिला. मूळ सांगवडे (ता. करवीर) येथील आदगोंडा पाटील यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. ते जयसिंगपूर येथे व्यवसाय व नोकरीनिमित्त 1939 साली आले. दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यांच्याबरोबर अससेल्या युवकांनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. यात आदगोंडा पाटील अग्रभागी होते.
गावोगावी जाऊन लोकांना एकत्र करणे, रेल्वेस्थानके पेटवून देणे, पोस्ट ऑफिस जाळणे, रेल्वे लुटणे, प्रभात फेरी काढणे, सभा घेणे, संघटन करणे, अशा स्वरूपाची कामे त्यांनी केली. कोल्हापूर येथील शिवाजी चौकातील सर विल्सन यांचा पुतळा फोडला. त्यानंतर ते महिना ते दोन महिने आडी येथे भूमिगत राहिले. कोल्हापूर व उदगाव येथील बि—टिशांच्या कोठडीत काही काळ त्यांनी शिक्षाही भोगली. आदगोंडा पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील (freedom struggle) योगदानाची दखल घेऊन 1995 पासून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना पेन्शन दिली जात आहे. 23 फेब—ुवारी 1988 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सन्मानपत्र प्रदान केले. सध्या देशात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कार्यालयाने आदगोंडा पाटील यांना शाल, श्रीफळ व गौरवपत्र पाठवले आहे. याचे वितरण प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार अपर्णा मोरे यांच्या हस्ते झाले.