आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त
गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात होऊन आता सहा दिवस उलटून गेले आहे. काल (4 सप्टेंबर) पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. आज (5 सप्टेंबर) सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.
दरम्यान गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा तसं कोणतंही बंधन नसल्याने सर्वत्र विसर्जन (Immersion) मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत.
आज गौरी-गणपती विसर्जनासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. तसेच पुणे, नाशिक या शहरांमध्येही पालिकेकडून तलाव आणि कृत्रिम तलाव उभारत विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. आज गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासन सतर्क आहे.
गौरी विसर्जनाचा मुहूर्त
शनिवारी 3 सप्टेंबर रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झालं. रविवारी गौरी आवाहन पार पडलं. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज (5 सप्टेंबर) सोमवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जनासाठी (Immersion) सकाळी 6 वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे.
या भागात अवजड वाहनांना प्रवेशबंदी
आज 05 सप्टेंबर रोजी गौरी – गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. परंतु, इतर जड वाहनांना या दिवशी मुंबईत प्रवेश करता येणार नाही. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, तसेच विसर्जनावेळी मुंबईत कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.