प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवनागी नाकारली

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी नाकारल्याचे समजते. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. त्याप्रमाणे यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra tableau) राजपथावर दिसेल, अशी आशा होती. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित यंदाचा चित्ररथ होता. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि बिहारच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याचे समजते. सुरक्षेचे कारण देत संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती आहे.प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्याची धमकी शीख फॅार जस्टीस या संघटनेने दिली आहे. आम्ही २६ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांना राजपथावर जाऊ देणार नाही. तसेच मोदी यांना इंडिया गेटवर जाण्यापासूनही रोखले जाईल, असे शीख फॅार जस्टीस संघटनेने म्हटले आहे. तसेच या संघटनेने न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही इशारा दिला आहे.महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा बाजी मारली होती. दोनदा प्रथम क्रमांक पटकावला होता. २०१५मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८०मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली ‘बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *