महाराष्ट्रात दोन दिवस साजरी होणार धनत्रयोदशी; जाणून घ्या तुमच्या शहरातील तिथी
उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. दोन वर्षांच्या करोना निर्बधांनंतर पहिल्यांदाच एवढ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. आज धनत्रयोदशीचा दिवस असला तरी नेमकी धनत्रयोदशी कधी आहे यासंदर्भात तिथी दोन दिवसांमध्ये विभागून आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्येही दोन दिवस धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी होणार असल्याचं दाते पंचांगामध्ये सांगण्यात आलं आहे.
आज आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी साजरी होत असली तरी संपूर्ण महाराष्ट्राभर साजरी होणार नसल्याचं दाते पंचांगमध्ये म्हटलं आहे. . महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी आज म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी आहे. तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत २३ ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी धनत्रयोदशीची तिथी आहे असं दाते पंचांगामध्ये म्हटलं आहे.
२२ ऑक्टोबर २०२२ रोजी शनिवारी द्वादशी समाप्ती सायंकाळी ६ वाजून तीन मिनिटांनी आहे. सायंकाळी ६ वाजून तीन मिनिटांनंतर सूर्यास्त होत असलेल्या गावांमध्ये २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. तसेच काही प्रदेशांमध्ये दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच रविवारी धनत्रयोदशी आहे.
२२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली काही प्रमुख ठिकाणं –
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोकण, गोवा, गोध्रा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशांमध्ये २२ ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी करावी.
२३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली काही प्रमुख ठिकाणं –
सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशांमध्ये २३ ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते, असं दाते पंचांगामध्ये म्हटलं आहे.