जांभळी कबड्डी स्पर्धेत खेळाडूंची तुंबळ हाणामारी
(sports news) शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे कबड्डी निवड चाचणी स्पर्धेदरम्यान दोन प्रतिस्पर्धी संघांत तुंबळ हाणामारी झाली. सामना सुरू असतानाच खेळाडूंमधील किरकोळ वादातून हा प्रकार घडला.
शिवीगाळ करत खुर्च्या फेकून मारण्यात आल्या. अचानक सुरू झालेल्या हाणामारीने प्रेक्षकांनी बैठक व्यवस्था सोडून मैदानात उड्या टाकल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. विशेष म्हणजे पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे यांच्या समोरच ही हाणामारी सुरू होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर असोसिएशन आणि संयोजन समितीवर अंतिम सामनाच रद्द करण्याची नामुष्की ओढवली.
जांभळी येथे कोल्हापूर जिल्हा खुला पुरुष व महिला गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास छावा शिरोली व शाहू सडोली यांच्यात अंतिम सामना होता. सुरुवातीला सडोली संघातील खेळाडूंच्या वजनावरून शिरोली संघाने आक्षेप घेत वाद घातला. त्यानंतर पुन्हा त्या खेळाडूंचे वजन करून शिरोली संघाचे समाधान झाल्यानंतर सामना सुरू करण्यात आला. 11-6 अशा 5 गुणांनी सडोलीचा संघ आघाडीवर होता. मात्र अचानक लागोपाठ चढाईच्या ओघात दोन्ही संघात भर मैदानात वाद उफाळून आला. तिथेच दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांवर तुटून पडले. (sports news)
शिरोली संघातील एकाने मैदानाच्या बाहेरून खुर्ची आणून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद सोडवण्यासाठी पदाधिकार्यांनी मध्यस्थी केली. मात्र शिरोली संघाचे खेळाडू माघार घेण्यास तयार नव्हते. दोन्ही संघाचे खेळाडू आणि समर्थकांकडून हुल्लडबाजी सुरू होती. वातावरण तणावाचे बनले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर सामना रद्दच करण्याचा निर्णय घेण्यात आला.