वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर यांच्या वतीने ‘प्रदूषणमुक्त पंचगंगा’ या विषयावर भव्य राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा
जयसिंगपूर -( प्रतिनिधी ) –
(local news) पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रदूषणाने अतिशय गंभीर बनलेल्या या प्रश्नावर जनजागृती व्हावी व या विरोधात जन आंदोलन उभे करून एक निर्णायक लढा उभा करता यावा या प्रमुख उद्देशाने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली पंचगंगा नदी राज्यातील प्रमुख नद्यांच्या पैकी एक आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह शेकडो छोट्या – मोठ्या गावातील सांडपाण्यामुळे व औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, सूतगिरण्या, वस्त्र उद्योगातील प्रोसेसिंग युनिट व प्रक्रिया करणारे उद्योग यातील रसायन मिश्रित व दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषित बनली आहे. तिचा नागरी वस्ती व शेतीवर खूप मोठा परिणाम होत असून प्रचंड मोठी रोगराई, त्वचा रोग, थंडी, ताप, सर्दी, साथीचे रोग व कॅन्सर या रोगाने थैमान घातले आहे. तसेच शेतीला रसायन मिश्रित पाणी गेल्याने शेतपिकाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली असून शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नापीक बनत चालल्या आहेत. तर थेट पाणी पिल्याने जनावरांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर दोघेही संकटात सापडले आहेत.
यासह अन्य अनेक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभे राहावे व लोकांच्यामध्ये याचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी या पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (local news)
या स्पर्धेमध्ये पोस्टरसाठी 1/2 इम्पेरियल साईजचा माउंटबोर्ड पेपर वापरायचा आहे. पोस्टर विषयाशी संबंधित घोषवाक्य इलेक्ट्रिशन असावे. एका स्पर्धकास एकच पोस्टर जमा करता येईल. प्रवेश फी रुपये 100 आकारण्यात येणार आहे. जमा केलेल्या पोस्टरवर सर्व अधिकार संयोजकांचे राहतील. पोस्टर परत मिळणार नाहीत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेमधून उत्कृष्ट पोस्टर म्हणून सात कलाकृती निवडल्या जाणार असून प्रत्येकी 9 हजार रुपयांची रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. हे पोस्टर 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत जमा करण्याची अंतिम मुदत असून 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी येथे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
ललित कला महाविद्यालय, जुनी शाळा नंबर 7, मोठे तळे, फेमस टेलर समोर इचलकरंजी येथे पोस्टर जमा करण्याचे आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विलास कांबळे यांनी दिली असून मोठ्या संख्येने या जनजागृती पोस्टर स्पर्धेत इच्छुकांनी भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
🙏🙏
संजय सुतार
आय टी व प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर.