ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धुळ चारली

वेस्ट इंडिज मध्ये सुरु असलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत (U19 Cricket World Cup) पाकिस्तानचं (Pakistan U19) आव्हान क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आलं आहे. काल झालेल्या क्वार्टर फायनलच्या तिसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia U19) पाकिस्तानला धूळ चारली व दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंड, अफगाणिस्ताननंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 119 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानला पूर्ण 50 षटकही खेळून काढता आली नाहीत. याआधी दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर पाकिस्तानची बाजू वरचढ होती. पण ऑस्ट्रेलियाने तो इतिहास बाजूल ठेवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सात विकेट गमावून 267 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विली आणि मिलरने 101 धावांची भागीदारी केली. पहिल्या तीन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियान संघाला 276 धावांचा पल्ला गाठता आला.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर टेग विलीने 97 चेंडूत सर्वाधिक 71 धावा केल्या. यात आठ चौकारांचा समावेश होता. दुसरा सलामीवर कॅम्पबेलने 47 धावा केल्या. कोरे मिलरने 75 चेंडूत 64 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. या तिघांशिवाय कॅप्टन कुपर कोनोलीने 33 आणि विलियमने 25 धावा केल्या. पाकिस्तानकडून कॅप्टन कासिम अक्रम तीन विकेट घेवून यशस्वी गोलंदाज ठरला.
277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 35.1 षटकात 157 धावात संपुष्टात आला. त्यांना पूर्ण 50 षटकही खेळून काढता आली नाहीत. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 119 धावांनी मोठा विजय मिळवला. पाकिस्तानकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहरान मुमताजने सर्वाधिक 29 धावा केल्या. त्यांचे अन्य फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले. 97 चेंडूत 71 धावा करणारा ऑस्ट्रेलियन सलामीवर टेग विली या सामन्याचा नायक ठरला. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *