भारतीय सैन्याशी नातं असलेली गाडी क्रिकेटपटू सूर्यकुमारच्या ताफ्यात
भारतीय क्रिकेट संघाचे पूर्वकप्तान महेंद्र सिंग धोनीप्रमाणेच फलंदाज सूर्यकुमार यादवसुद्धा गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे सुरुवातीपासूनच अनेक गाड्या आहेत. नुकतंच त्याच्या या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका खास गाडीचा समावेश झाला आहे. सूर्यकुमारने आपल्या या गाडीला ‘हल्क’ (HULK) असे नाव दिले आहे. त्याने आपल्या या गाडीचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
सूर्यकुमार याने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे, ‘माझ्या नव्या खेळण्याला हॅलो म्हणा. याचे नाव हल्क आहे.’ टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. मुंबई इंडियन्स टीमच्या वतीने देखील कमेंट करण्यात आलंय. चेतन साकरियाने म्हटलं, ‘हा हल्क तुमच्यासारखा स्मॅश करतो का? ऋषी धवनने म्हटलंय, ‘वा! हा रंग तुमच्यावर सूट करतो सूर्यकुमार भाई.’
सूर्यकुमार यादवचा हा हल्क निसान कंपनीची जोंगा मॉडेल जीप आहे. जोंगाचा स्वतःचा एक इतिहास आहे. निसानद्वारे डिझाईन केलेली ही गाडी भारतीय सेवेद्वारे वापरली जात असे. तथापि, भारतीय सेनेने याची सेवा घेणे बंद केली आहे. सूर्यकुमार हा एकटा असा खेळाडू नाही ज्याच्याकडे ही गाडी आहे. एम.एस. धोनीच्या गॅरेजमध्ये देखील एक जोंगा आहे. रांचीमध्ये अनेकदा त्याला ही गाडी चालवताना पाहिले गेले आहे.
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने नुकतंच ४ खेळाडूंना रिटेन केलं आहे. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव याची, फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामध्ये होणाऱ्या टी ट्वेन्टी आणि वनडे सामन्यांसाठी देखील निवड झाली आहे. वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळू शकते. वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्ये ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला आणि टी-२० मालिका १६, १८ आणि २० फेब्रुवारीला कोलकात्यात होणार आहे.