दुसरा कपिल देव शोधणं बंद करा..!
भारतीय क्रिकेट संघ सध्या विविध बदलांमधून जात आहे. विराट कोहली संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळा झाला. त्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कप्तान बनवण्यात आले. संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजापासून पूर्णवेळ ऑलराऊंडर खेळाडूचा शोध अजून संपलेला नाही. दुखापतींमुळे हार्दिक पंड्या बेजार झाला असल्याने त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच माजी सलामीवीर गौतम गंभीरने अष्टपैलू खेळाडूबाबत एक सल्ला दिला आहे,.
गंभीरने एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना सांगितले, “जर तुमच्याकडे काही नसेल, तर त्यासाठी जाऊ नका. तुम्हाला स्वीकारावे लागेल आणि पुढे जावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय स्तराऐवजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंना तयार करावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे कोणाला तयार करण्यासाठी नसून चांगली कामगिरी दाखवण्यासाठी असते. खेळाडूंना देशांतर्गत आणि भारत अ स्तरावर तयार केले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुम्हाला तिथे जावे लागते आणि कामगिरी करून दाखवावी लागते.”
“प्रामाणिकपणे सांगायचे, तर आम्ही कपिल देवपासून अष्टपैलू खेळाडू नसल्याबद्दल बोलत आहोत. म्हणून पुढे जा आणि रणजी ट्रॉफीमध्ये लोकांना विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि एकदा ते तयार झाल्यावर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेऊन जा. त्यांना लवकर बदलू नका. आम्ही विजय शंकर, शिवम दुबे आणि आता व्यंकटेश अय्यर यांना जास्त संधी मिळत नसल्याचे पाहिले आहे. आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे.”
या महिन्याच्या सुरुवातीला वेंकटेश अय्यरला दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही आणि तिसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी व्यंकटेश अय्यरचा संघात समावेश करण्यात आलेला नाही, यावरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.