टोल भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती फेकू नका; तिचे फायदे जाणून थक्कच व्हाल

तुम्ही जेव्हाजेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास रस्ते मार्गानं करता तेव्हातेव्हा ठराविक अंतरावर, शहरांच्या सीमांवर टोल नाके (Toll booths) असल्याचं पाहता. सुरुवातीला रोख स्वरुपात हा टोल नाक्यांवर वाहनांकडून निर्धारित रक्कम आकारली जात होती. आता त्याचंच रुपांतर (Fastag) फास्टॅगमध्ये झालं असून, थेट स्कॅन होऊन तुमच्या खात्यातून टोलचे पैसे कापले जातात. पण, अद्यापही अशी बरीच वाहनं आहेत ज्यांच्याकडून रोख स्वरुपात टोल आकारला जातो.

रोख स्वरुपात टोल भरल्यानंतर आपलं वाहन ज्यावेळी त्या ठिकाणाहून निघतं तेव्हा तिथं असणारे कर्मचारी आपल्याला एक पावती देतात. सहसा आपण ती पावती काही कामाची नाही असं म्हणून एकतर ती फेकून देतो किंवा वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये कुठेतरी दडवून ठेवतो. पण, कागदाचा हाच लहानसा तुकडा किती फायद्याचा आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?

Toll Receipt चे फायदे इतके आहेत की इथून पुढं तुम्ही ती फेकून देण्याऐवजी सांभाळून ठेवाल. कारण, अडीअडचणीच्या वेळी हीच इवलिशी पावती तुम्हाला मदत करणार आहे.

चला जाणून घेऊयाया पावतीचे फायदे…

– तुमच्या वाहनातील पेट्रोल किंवा डिझेल संपलं आणि जवळपास कोणतीही मदत मिळाली नाही तर टोलच्या पावतीवर असणाऱ्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून तुम्ही 5 किंवा 10 लीटर पेट्रोल मिळवू शकता. अर्थात तुम्हाला या इंधनाचे पैसे भरावे लागतील.

– तुम्ही जर कारनं प्रवास करत आहात आणि रस्त्यात मध्येच कारचा टायक पंक्चर झाला, तर टोलच्या पावतीवर असणारा आणखी एक क्रमांक डायल करून तुम्ही मदत मिळवू शकता.

– टोलच्या (Toll booths) पावतीवर काही दूरध्वनी क्रमांक दिलेले असतात. अडीअडचणीच्या वेळी अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही या क्रमांकांशी संपर्क साधून मदत मिळवू शकता. यामध्ये Medical Emergancy उदभवल्यासही तुमच्यापर्यंत किमान वेळेत मदत पोहोचू शकते.

सहसा राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करत असताना मिळालेल्या टोलच्या पावतीवर या सुविधा मिळतात. या सुविधांविषयी फार कमीजणांना माहिती असल्यामुळं अनेकदा अडचणीच्या प्रसंगी नागरिक घाबरून जातात आणि त्यांच्यापर्यंत वेळीच मदतीचा हात पोहोचत नाही.

एक बाब लक्षात घेणं महत्त्वाचं की, सर्वच टोलच्या पावत्यांवर हेल्पलाईन क्रमांक दिलेले नसतात. अशा वेळी तुम्ही सरकारच्या टोल फ्री आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 1033 वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *