महागाईचा विळखा कमी झाला! दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर महागाई

किरकोळ महागाईतील (Inflation) घसरण सुरूच आहे. भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाने मे २०२३ मधील किरकोळ महागाईची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन उत्पादनांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दरात घट नोंदवली गेली आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.२५% वर आला, जो २५ महिन्यांतील महागाईचा नीचांक आहे. एप्रिल २०२१ मध्ये महागाई ४.२३% होती. महागाईतील ही घट खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे झाली आहे. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ४.७० टक्के होता.

ग्रामीण भागातील महागाई ४.६८ टक्क्यांवरून ४.१७% वर आली असून शहरी चलनवाढीचा दर ४.८५ टक्क्यांवरून ४.२७ टक्क्यांवर आला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) बास्केटमध्ये अन्न वस्तूंचा वाटा जवळपास निम्मा आहे. मे महिन्यात अन्नधान्य महागाई २.९१ टक्क्यांवर आली तर, एप्रिल २०२३ मध्ये हा आकडा ३.८४ टक्के आणि मार्चमध्ये ४.७९% होता.

सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी भारतातील किरकोळ महागाईची (Inflation) आकडेवारी जाहीर केली. मे महिन्यात तो वार्षिक आधारावर ४.२५ टक्क्यांच्या २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. तर एप्रिलमध्ये तो ४.७०% होता. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सहनशीलतेच्या २ ते ६ टक्क्यांच्या आत राहिली. मे महिन्यात भाजीपाल्याच्या महागाई दरात ८.१% घट झाली होती. अन्न-पेय आणि इंधन विभागातील महागाई पातळी अनुक्रमे ३.२९ टक्के आणि ४.६४ टक्के आहे. त्याच वेळी, तृणधान्यांचा महागाई दर १३.६७ टक्क्यांवरून १२.६५ टक्क्यांवर आला.

तृणधान्ये आणि भाजीपाल्यांच्या किमती नरमल्याने मे महिन्यात महागाईचा स्तर कमी ठेवण्यास मदत झाली आहे. त्याच वेळी, एलपीजी आणि केरोसिनच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये तीव्र घसरण देखील मे महिन्यात कमी इंधन महागाईशी जोडली जाऊ शकते. ४५ अर्थशास्त्रज्ञांच्या रॉयटर्स पोलने एप्रिलमधील ४.७० टक्क्यांवरून मे महिन्यात महागाई ४.४२ टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *