पुजारा-रहाणेसाठी ‘करो वा मरो’ची लढाई,
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे भारतीय टेस्ट टीममधील दोन दिग्गज बराच काळापासून ‘आऊट ऑफ फॉर्म’ आहेत. दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्यांनी निराशा केली. त्यामुळे भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) या आगामी टेस्ट सीरिजसाठी त्यांची टीम इंडियातील जागा धोक्यात आली आहे. या दोघांचे आंतरराष्ट्रीय करिअर सध्या धोक्यात आहे. हे करिअर वाचवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
पुजारा-रहाणे जोडीला फॉर्मध्ये परतण्याची आणि करिअर वाचवण्याची एक अनोखी संधी चालून आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) मोठी खेळी करत टेस्ट टीममधील दावेदारी कायम ठेवण्याची त्यांना संधी आहे. रणजी ट्रॉफीतील एलिट ग्रुपच्या मॅच 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिज 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सीरिजपूर्वी निवड समितीचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना किमान 2 संधी आहेत.
अजिंक्यनं मुंबई तर पुजारानं सौराष्ट्र टीमकडून रणजी स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अहमादाबादमध्ये मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात हे दिग्गज एकमेकांच्या विरूद्ध खेळू शकतात. ‘अजिंक्य रहाणे निश्चितपणे सज्ज आहे. आम्ही अनेकदा भेटलो आहोत. तो मुंबई टीमसोबत सराव करत असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे.’ अशी माहिती मुंबईचे कोच अमोल मजमूदार यांनी दिली आहे.