लतादीदींच्या स्मारकासाठी भाजपकडून आता शरद पवारांची मनधरणी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी कालच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात शिवाजी पार्कमध्येच लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राम कदम (Ram Kadam) यांनी केली होती. मात्र, या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता राम कदम यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र पाठवले आहे. शरद पवारजी तुम्ही महाराष्ट्र सरकारला लतादीदींचे अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी त्यांचे स्मारक उभारायला सांगाल का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार किमान शरद पवार यांच्या बोलण्याचा मान तरी ठेवतात का, हे पाहू, असे सांगत राम कदम यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता यावर महाविकासआघाडीचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, पाहावे लागेल.
भाजपचे आमदार राम कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. भारतरत्न लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कोट्यवधी चाहते, संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या हितचिंतकांच्या वतीने माझी विनंती आहे की, लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावं, ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, असं राम कदम यांनी पत्रात नमूद केले होते. या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते.
शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे भाजप आमदार राम कदम यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. काही लोकांनी लतादीदींच्या (LataMangeshkar) स्मारकाची मागणी केली आहे. पण त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण करु नका, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिला होता.

लता मंगेशकर यांचं स्मारक उभारणं ही काही इतकी सोपी बाब नव्हे. त्या काही राजनेता नव्हत्या. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या आहेत आणि जगाच्याही आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशाप्रकारचं लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारं स्मारक महाराष्ट्रात नक्की उभारलं जाईल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नक्की त्याचा विचार करेल. लता मंगेशकर या काही राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो देशाचा अनमोल ठेवा होता, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *