ममता बॅनर्जी, “योगी तुम्हाला खाऊन टाकतील, ‘सपा’ला मतं द्या”
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पार्टीसाठी मत मागितली. मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सपासाठी मत मागताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ तुम्हाला खाऊन टाकतील अल्पसंख्याकांनी एकत्र येऊन सपाला मतदान करावं”, अशी विनंतीही त्यांनी केली.
“कोरोनामध्ये कित्येक लोक मारले गेले. हाथरसमध्ये जी घटना झाली, त्यासाठी पहिल्यांदा भाजपने माफी मागावी. नंतर मतं मागावीत. सर्वांत जास्त निधी उत्तर प्रदेशला दिला. पण, युपीचा विकास झालाच नाही. योगी सरकारला कोरोनाकाळात मृत लोकांना अग्नी देण्याासाठी लाकडंदेखील उपलब्ध करून देता आली नव्हती. भाजप इतिहास बदलण्याचे काम करत आहे. स्टेशनची नावं बदलत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी ते खेळ करत आहे”, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “युपीमध्ये एनआरसी आंदोलनाच्या वेळी एन्काऊंटरच्या नावाखाली कित्येक लोकांची हत्या केली, हे आपण पाहिलं आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठं राज्य आहे, जर या राज्यातून भाजपा गेली तर संपूर्ण देशातून भाजप जाऊ शकेल. त्यामुळे युपीमध्ये भाजपाचा पराभव करणं गरजेचं आहे. त्यामुळे युपीतील लढाई ही आता इज्जतीची लढाई झालेली आहे”, असे मत ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत मांडलं.
“युपीमध्ये अखिलेश जिंकतील. फक्त वेस्ट युपीने दिशा दाखवावी, तेव्हा संपूर्ण युपी तुम्हाला फाॅलो करेल. तृणमूल काॅंग्रेसने केलेल्या योजनांची नक्कल भाजप करते. तर नक्कल करायचीच असेल तर व्यवस्थित नक्कल करा. लोकांचा खून करू नका. नोटबंदी करू नका. एनआरसी करू नका. फाळणी करू नका. पुन्हा योगी सत्तेवर आले तर तुम्हाला ते खाऊन टाकतील”, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.