चांद्रयान- ३ च्या यशानंतर आता मिशन आदित्य एल1 चा मुहूर्त ठरला

चांद्रयान- ३ च्या यशानंतर आता सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ मोहीम (mission) आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची तारीख इस्रोने जाहीर केली आहे. आदित्य-L1चे प्रक्षेपण २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:५० वाजता श्रीहरिकोटा येथून होईल, अशी माहिती ISRO दिली आहे. ‘चांद्रयान-३’ च्या ऐतिहासिक यशानंतर सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने २ सप्टेंबर रोजी सूर्यमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

‘आदित्य-एल 1’ या अवकाश यानाद्वारे सूर्याभोवतीच्या तेजोमंडळ आणि प्रभामंडलाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांना ग्रह-तार्‍यांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. सूर्यमोहिमेबाबत माहिती देताना इस्रोने सांगितले की, या यानावरील ७ पेलोडस्द्वारे सूर्याभोवतीच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. ४ पेलोडस् थेट सूर्याचे, तर ३ पेलोडस् सूर्यकिरणांचे निरीक्षण करणार आहेत.

यूव्ही पेलोड आणि एक्स-रे पेलोडद्वारे सूर्याभोवतीच्या वातावरणाचे निरीक्षण केले जाणार आहे. विद्युतचुंबकीय लहरी, प्रभारित विद्युतकण आदींचीही माहिती मिळणार आहे. बंगळूरमधील इस्रोच्या मुख्यालयातून या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. (१.५ दशलक्ष कि.मी.) अंतरावरील कक्षेत ‘आदित्य-एल 1’ अवकाश यान स्थिरावणार आहे. हे यान पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तिथे पोचल्यानंतर ते सूर्याभोवतीच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करणार आहे. सूर्याभोवतीचे तापमान, सौरलहरी, सूर्यकण, सूर्यकिरणे, वातावरणातील तापमानाचे प्रमाण, घनता, विद्युतचुंबकीय लहरी आदींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

चांद्रयान-३ च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता आदित्य एल-१ (Aditya L-1) आणि गगनयान मोहिमेच्या तयारीला लागली आहे. या मोहिमेविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यापूर्वी माहिती दिली होती. “सूर्य आणि भोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आदित्य मोहीम (mission) आखली आहे. ही मोहिम सप्टेंबरमध्ये प्रक्षेपणासाठी सज्ज होत आहे. गगनयानचे (Gaganyaan mission) काम प्रगतीपथावर आहे. आम्ही कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या अखेरीस क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक मोहीम करू. त्यानंतर २०२५ पर्यंत पहिली मानवयुक्त मोहीम होईपर्यंत अनेक चाचणी मोहिमा केल्या जातील.” असे एस. सोमनाथ यांनी सांगितले.

३ लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या ‘चांद्रयान-३’ने २३ ऑगस्टला इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. चांद्रयानाच्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय टेकवले आणि अवघा देश आनंदाने बेभान झाला. या मोहिमेच्या यशानंतर आता इस्रोने आदित्य L-1 च्या प्रेक्षपणाची तयारी केली आहे. यातून सूर्याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य L-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय मोहीम असेल. या मोहिमेमुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचालींचे निरीक्षण करण्याचा आणि रिअल टाइममध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा काय परिणाम होतो हे कळणार आहे.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी अंतराळ यानामध्ये सात पेलोड असतील. विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 च्या माध्यमातून चार पेलोड्स थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लॅग्रेंज पॉइंट L1 वर कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील, असे इस्रोने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *