स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो लवकरच कुस्तीच्या आखाड्यात
(sports news) पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल – नासरकडून खेळत आहे. या स्पर्धेत तो चांगलाच रमल्याचे दिसत असताना आता फुटबॉलचे मैदान गाजविल्यानंतर तो डब्ल्यूडब्ल्यूई (वर्ल्ड रेस्लिंग एंटरटेन्मेंट) म्हणजेच चक्क कुस्तीच्या आखाड्यातही दिसणार आहे. अर्थात, त्यासाठी त्याला तगडे मानधनही द्यावे लागणार आहे.
तो कुस्तीपटू होणार काय, असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याचे उत्तर नाही, असे आहे. कारण, तो या स्पर्धेत पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे. सौदी अरेबियात नोव्हेंबर महिन्यात होणार्या क्राऊन ज्वेल इव्हेंटसाठी रोनाल्डोला पाहुणा म्हणून बोलावण्याचे नियोजन केले जात आहे.
रोनाल्डो जेव्हापासून अल नासरकडून खेळायला लागला आहे तेव्हापासून सौदी अरेबिया क्रीडा जगतात एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. डिसेंबर 2022 मध्ये 215 मिलियन अमेरिकन डॉलरचे डील पदरात पाडून रोनाल्डो अल नासरवासी झाला. तेव्हापासून अल नासरला फुटबॉल जगतात चर्चेत ठेवण्यात हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू यशस्वी ठरला आहे. (Cristiano Ronaldo)
रोनाल्डोच्या आगमनापासून प्रेक्षकसंख्या, चाहत्यांची फुटबॉलमधील रुची, सौदी फुटबॉल यांची वाढ होताना दिसत आहे. आता डब्ल्यूडब्ल्यूईदेखील या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी धडपडत आहे. रोनाल्डोच्या प्रतिमेचा फायदा त्यांच्या क्राऊन ज्वेल इव्हेंटसाटी करून घ्यायचा आहे. वृत्तसंस्था एएसने दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूब्ल्यूईचे नवे मालक एन्डेव्होर हे क्राऊन ज्वेलच्या नफ्यात आणि संभाव्य उत्पन्नात वाढ करू इच्छितात. त्यासाठी त्यांनी रोनाल्डोचा मार्केटिंगसाठी वापर करण्याचे ठरवले आहे. मात्र, यासाठी त्यांना रोनाल्डोला तितकेच तगडे मानधनही द्यावे लागेल. (sports news)
इराणमध्ये अभूतपूर्व स्वागत
डब्ल्यूडब्ल्यूईने सौदी अरेबियात यापूर्वी 4 क्राऊन ज्वेल इव्हेंट आयोजित केले आहेत. त्यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा या इव्हेंटचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये नाईट ऑफ चॅम्पियन्स हा इव्हेंट देखील केला होता. अल नासरचा संघ तेहरानमध्ये पोहोचला होता. त्यावेळी इराणच्या चाहत्यांनी त्याचे जबरदस्त स्वागत केले होते. रोनाल्डो एएफसी चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप ‘इ’ मधील सामन्यासाठी इराणला गेला होता. रोनाल्डो जेथे जातो तेथे चाहते प्रचंड संख्येने उपस्थित राहून त्याचे स्वागत करत असतात. आता डब्ल्यूडब्ल्यूईची लज्जत रोनाल्डोच्या सहभागामुळे वाढणार आहे.