महाराष्ट्राचे तीन मंत्री, खासदारावर बेळगावात प्रवेश बंदीचे आदेश जारी
बेळगावात एक नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) आणि सीमाभागातील मराठी भाषिकांकडून काळा दिन (Black Day) पाळण्यात येणार आहे. त्याला महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदार उपस्थित राहण्याचे संकेत मिळताच जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी काल (ता. ३०) महाराष्ट्राच्या तीन मंत्री आणि एका खासदारावर बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचे आदेश जारी केले आहेत.
प्रवेशबंदी जारी आदेशात मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. याशिवाय खासदार धैर्यशील माने यांच्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोल्हापूर दौऱ्यात बेळगावात आयोजित काळ्या दिनाला (Black Day) महाराष्ट्रातील मंत्र्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानुसार मंत्री देसाई, मंत्री पाटील, आणि मंत्री केसरकर बेळगाव येथील काळ्या दिनाला आयोजित फेरी आणि त्यानंतर मराठा मंदिरमध्ये आयोजित सभेला उपस्थित राहण्याची दाट शक्यता होती.
काँग्रेस सरकार धोक्यात? गृहमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्र्यांची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीने राजकीय चर्चांना उधाण
मात्र, त्यांच्या दौऱ्याला आक्षेप घेण्यास सुरुवात करण्यात आली असून त्यांच्यावर निर्बंध जारी करणे करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकाने रडीचा डाव सुरू केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात बजावलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आणि मराठी भाषिकांकडून बेळगावला एक नोव्हेंबरला काळादिन पाळण्यात येणार आहे.
यादिवशी फेरी आणि त्यानंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करण्याचे नियोजन आहे. यात महाराष्ट्रातून मंत्री उपस्थित राहिल्यामुळे दोन भाषिकांत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्बंधचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे या दरम्यान महाराष्ट्र मंत्र्यांनी आणि खासदारांनी उपस्थित राहू नये, असे पाटील यांनी कळविले आहे.