चिंता वाढली! ‘झिका’साठी राज्य सरकारची नियमावली

ऑक्टोबरपासून राज्यामध्ये झिकाचे पाच रुग्ण (patient) आढळले आहेत. त्यामुळे झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इचलकरंजीमध्ये दोन तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये झिकाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्याचप्रमाणे देशातही मागील काही दिवसांपासून झिकाचे रुग्ण आढळून येत आहेत. शेजारील कर्नाटकमध्येही हा आजार पसरवणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. झिका रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही झिकाचे लक्षण असलेले रुग्ण आल्यास त्यांचा नमुना सरकारी यंत्रणेमार्फत पुण्यातील एनआयव्ही येथे तपासून घ्यावा.

यामुळे झिकाचा प्रसार

झिका विषाणू हा फलॅव्हिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास दिवसा चावतो. हा डास डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप पसरवतो.

प्रसार कसा होतो?

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने लैंगिक संबंध, गर्भाद्वारे संक्रमण, रक्त आणि प्रत्यारोपणाद्वारे, गर्भधारणेदरम्यान, आईपासून रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारपणाद्वारे होतो. झिकाची चिन्हे व लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिकाची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यूसारखी असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिकाचे निदान व उपचार नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

हे लक्षात ठेवा

डेंग्यू आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे (patient) रक्त २ ते ८ अंश तापमानात शीतशृंखला अबाधित ठेवूनन तपासणीसाठी पाठवावे. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. तापावर पॅरासिटामॉल औषध वापरावे. ऑस्पिरिन अथवा एनएसएआयडी प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *