दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून महत्वाची अपडेट
दहावी, बारावीची परीक्षा (exam) देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दरम्यान बोर्डाने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी (exam) ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह 21 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.
अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.