‘टी-२०’ प्रकाराला रोहित शर्माचा गुडबाय ?
(sports news) एकदिवसीय विश्वकरंडक संपल्यावर आता कर्णधार रोहित शर्माच्या मर्यादित षटकांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयने त्याच्याशी या संदर्भात चर्चा केल्याचे वृत्त आहे; परंतु मिळालेल्या माहितीनुसार रोहित आता केवळ कसोटी क्रिकेटवर लक्ष देणार असून यापुढे ‘ट्वेन्टी-२०’ प्रकारात खेळणार नसल्याचे समजते.
येत्या जून-जुलै महिन्यात ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. ‘ट्वेन्टी-२०’ प्रकारासाठी आपला विचार करू नका, असे रोहितने निवड समितीला सांगिल्याचे वृत्त आहे. रोहित आणि विराट कोहली हे गेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकही ‘ट्वेन्टी-२०’ सामना खेळलेले नाहीत.
निवड समिती या प्रकारासाठी आता नवोदितांचा विचार करून नव्याने संघ उभारणीकडे भर देत आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत भारत एकूण ११ ‘ट्वेन्टी-२०’ सामने खेळणार आहे. यात रोहितला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे; तसेच यादरम्यान भारतीय संघ पुढील सात महिन्यांत केवळ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ही मालिका दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांबाबत रोहित आत्ताच निर्णय घेण्याची शक्यता नसल्याचेही काही जण सांगत आहे. (sports news)
पुढचा एकदिवसीय विश्वकरंडक २०२७ मध्ये होणार आहे, तोपर्यंत रोहित ३९ वर्षांचा असेल; परंतु पुढील वर्षी पाकिस्तानध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होत आहे. त्यामध्ये रोहित खेळण्याची शक्यता नाकारली जात नाही; परंतु हे सर्व तो बीसीसीआय पदाधिकारी आणि निवड समिती यांच्याशी होणाऱ्या बैठकीनंतर निश्चित होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पूर्णपणे रोहितचा निर्णय
एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित शर्मा गेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेनंतर आत्तापर्यंत एकही ‘टी-२०’ सामना खेळलेला नाही. त्याने या संदर्भात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली आहे. तो स्वतःहून ‘टी-२०’ प्रकारातून दूर रहात आहे आणि तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी ‘पीटीआय’ला दिली.