खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा भडकल्या, जाणून घ्या नवीन दर
शहर परिसरात तीन प्रकारच्या खाद्यतेलांत (edible oils) किरकोळ दरवाढ झाली आहे. नवीन शेंगदाणा तेल अद्याप बाजारात उपलब्ध झाले नसल्याने शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. पुढील महिन्यापर्यंत नवीन आवक सुरू होऊन शेंगदाणा तेलाचे दर कमी होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
– पावसाचा फटका
यंदाच्या अपुऱ्या व अवेळी झालेल्या पावसाचा कमी-अधिक फटका खाद्यतेल उत्पादनावर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून नवीन शेंगदाणा तेल बाजारात येण्यास किमान महिन्याभराचा उशीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीन रिफाईंड, सूर्यफूल तसेच सरकी रिफाईंड तेलाचे दर लिटरमागे १०० रुपयांवरुन १०५ रुपयांपर्यंत गेले आहेत; म्हणजेच या तीन प्रकारच्या खाद्यतेलांत लिटरमागे पाच रुपयांनी दरवाढ झाली आहे.
– करडी, शेंगदाणा भाव कायम
करडी; तसेच शेंगदाणा तेलाचे दर १८० ते १८५ रुपयांवर कायम आहेत. दरम्यान, नवीन शेंगदाणा तेलाची आवक सुरू झाल्यावर या तेलाचे दर लिटरमागे किमान १० ते २० रुपयांनी घटू शकतात, अशीही शक्यता खाद्यतेलाचे (edible oils) व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केली आहे.
– ग्राहकी रोडावली
दिवाळीनिमित्त घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या समस्त फराळ व इतर खाद्यवस्तूंसाठी नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यानिमित्ताने सर्वच खाद्यतेलांचा वापर होत असल्याने किमान काही आठवडे ग्राहकी जोरात होती; परंतु दिवाळी सरताच ग्राहकी पार रोडावली असल्याचे निरीक्षणही व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.