कोल्हापूर फुटबॉल सामन्यात प्रथमच होणार ‘टायब्रेकर’चा अवलंब
(sports news) येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (Kolhapur Sports Association) आयोजित श्री शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेत (Football Tournament) प्रथमच सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये घेतला जाणार आहे. पंधरा डिसेंबरपासून स्पर्धेस प्रारंभ होणार असून, याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
आता स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ (ब) या संघांमध्ये पंधरा डिसेंबरला दुपारी दीड वाजता पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या संघात होणार आहे.
या हंगामात कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने खेळाचे नियम व आचारसंहिता तयार केली असून, ती सर्व संघ प्रतिनिधींना दिली आहे. वरिष्ठ साखळी स्पर्धा सीनियर सुपर एठ (वरचा गट) आणि सीनियर एट (खालचा गट) या गटांत होणार आहे. सीनियर सुपर एट गटामध्ये विजयी संघाला तीन गुण, पराभूत संघाला शून्य गुण, तर बरोबरी राखणाऱ्या संघाला एक गुण देण्यात येणार आहे. (sports news)
मात्र, सिनियर एठ (खालचा गट) गटामध्ये सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागणार आहे आणि पराभूत संघाला शून्य गुण मिळणार आहेत. या वर्षीपासून प्रथमच सीनियर गटामध्ये टायब्रेकरच्या नियमाचा अवलंब होणार आहे. या गटात झुंजार क्लब, बीजीएम स्पोर्टस्, संध्यामठ तरुण मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब), सोल्जर ग्रुप, कोल्हापूर पोलिस, सम्राट नगर स्पोर्टस् या संघांचा समावेश आहे.