संपामुळं एसटी ठप्प; आता प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे (strike) राज्य परिवहन सेवा ठप्प झाली आहे. एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने १,२२५ खासगी चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात ९ हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही खासगी चालकांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे, असे महामंडळाने सांगितले.

प्रत्यक्षात राज्यातील अनेक मार्गांवर एसटी सुरू झाल्याचे दिसत नाही. दोन फेऱ्यांमध्ये तास-दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. साध्या बससेवेच्या तुलनेत वातानुकूलित खासगी शिवशाही-शिवनेरीच्या गाड्या धावताना दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवासी खासगी बस, वडाप-मॅक्सिकॅब, काळी-पिवळी जीप अशा पर्यायी आणि अनधिकृत गाड्यांतून प्रवास करत आहेत.

एसटी संपापूर्वी राज्यात ९४ हजारांहून अधिक एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र संपामुळे सध्या ९ हजार ६३६ फेऱ्या सुरू आहेत. त्याचबरोबर २४९ आगार अंशतः सुरू करण्यात आले आहेत, असे महामंडळाने म्हटले आहे.

परीक्षाकाळात विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहावी तसेच, करोना नियंत्रणात आल्याने राज्यातील नागरिकांची प्रवासासाठी वाढलेली मागणी पाहता महामंडळात खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येत आहे. जानेवारीमध्ये खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करून १२२५ खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचा आढावा घेतल्यानंतर आणखी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

२८ हजार कर्मचारी परतले

‘एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा’, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या मागणीवर निर्णय होईपर्यंत संप (strike) कायम ठेवण्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. ६४,२९६ कर्मचारी संपावर ठाम असल्याने राज्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. २७,९८० कर्मचारी संपातून माघारी येत पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. या संपात चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *