पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा

नव्या वर्षाचं स्वागत आणि 2023 या वर्षाला अनोख्या अंदाजात निरोप देण्यासाठी म्हणून सर्वांचीच लगबग सुरु आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळं अनेकांनीच भटकंतीचे बेत आखले आहेत. पर्यटनस्थळं, गिरीस्थानं, वस्तूसंग्रहालयं, ऐतिहासिक वास्तू, खरेदीची ठिकाणं अशा एक ना अनेक ठिकाणांवर होणारी गर्दी आता वाढू लागली आहे. काही पर्यटनस्थळांवर तर क्षमतेहून दुपटीनं गर्दी झाली आहे. पण, या परिस्थितीमध्ये एका संकटाचं सावट असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास हेच संकट जीवावर बेतू शकण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

हे संकट आहे कोरोनाचं. गेल्या काही दिवसांपासून एकिकडे कोरोनाचा नवा विषाणू (virus) आणि कोरोना संसर्ग फोफावण्याचं वृत्त असतानाच दुसरीकडे मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडल्यामुळं त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. त्यातच राज्यात सर्वसामान्य ताप, फ्लूची साथही असल्यामुळं अनेकांनाच ही समस्या भेडसावच आहे. पण, हा बेजबाबदारपणा इतरांनाही धोका पोहोचवू शकतो कारण ही वाढती गर्दी आणि नियमांची पायमल्ली पाहता करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक संभवतो.

राज्यातील हे एकंदर चित्र पाहता पुढील किमान 10 – 15 दिवस आरोग्य यंत्रणेनेसोबतच नागरिकांनी सतर्क रहावें, असं इशारावजा आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सध्या राज्यात करोनाच्या ‘जेएन.1’ या नव्या व्हेरिएंटचे (virus) रुग्ण आढळत असल्यामुळं कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. ज्यामध्ये राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात चर्चा झाली.

काय म्हणाले टास्क फोर्सचे अध्यक्ष?

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी बैठकीसंदर्भातील माहिती देत नवा व्हेरिएंट मोठा धोका निर्माण करेल अशी परिस्थिती सध्या नसली तरीही वयोवृद्ध आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं. राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *