रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर पुन्हा कर्णधार

(sports news) रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच खेळलेले नाहीत; पण अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दोघांचेही पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव यांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. ऋतुराज गायकवाडही याच कारणामुळे टी-20 मालिकेत खेळणार नाही.

इशान किशनला या मालिकेतून डच्चू दिला गेल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संजू सॅमसन व जितेश शर्मा हे दोन यष्टिरक्षक-फलंदाज संघात आहेत. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर असताना इशानने ‘बीसीसीआय’कडे विश्रांतीची मागणी केली होती आणि त्याला रीलिज केले गेले होते; पण अफगाणिस्तानविरुद्ध त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. रोहित व विराट यांना टी-20 त पुनरागमनाची संधी देण्याची निवड समिती व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मागणी ‘बीसीसीआय’ला मान्य करावी लागल्याचे, या संघावरून दिसले आहे. त्यामुळे या सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता सर्वांच्या नजरा असणार आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

टी-20 वर्ल्डकप 1 जूनपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्यानंतर ‘आयपीएल 2024’ मध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवून असणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार. (sports news)

* अफगाणविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
* विराटही खेळणार; बुमराह, सिराज, जडेजाला विश्रांती
* हार्दिक पंड्या, सूर्यकुमार, ऋतुराज दुखापतीमुळे बाहेर
* संजू सॅमसन, जितेश शर्माला संधी, इशानकडे दुर्लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *